“…डोक्यात काठी घालून पुढे जायचं, नाव न घेता पडळकरांची पुन्हा शरद पवारांवर खोचक टीका
Gopichand Padalkar On Sharad Pawar : धनगरांना आरक्षण मिळावं म्हणून अनेकांनी लढा उभारला, अनेकांनी प्रयत्न केले पण शरद पवारांनी (Sharad Pawar) धनगरांना आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं तर ठिक नाहीतर रस्त्यावरची लढाई लढण्याचा आमचा प्लॅन बी असेल. लबाड लांडग्याच्या डोक्यात काठी घालून पुढं जायचंय, अशी खोचक टीका नाव न घेता पडळकरांनी पवारांवर केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सिंधुदुर्गातील ओरोस येथे धनगर जागर यात्रेच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी भाषणातून शरद पवारांवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, नव्याने आम्ही आरक्षण मागत नसून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेले आरक्षण आम्ही मागत आहोत. थांबलेले आरक्षण सरकारने आम्हाला दिलं पाहिजे. या प्रकरणी कोर्टात 170 पुरावे दिलेले आहेत. डिसेंबर अखेर आम्हाला आरक्षण मिळेल.
पडळकर म्हणाले की, “धनगर आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, धनगर आरक्षण मिळत नाही यासाठी बारामतीचे पवार कारणीभूत आहेत. पवारांनी आपल्या समाजाचा घात केला आहे. महाराष्ट्रात धनगर जात आहे, असे 2019 मध्ये फडणवीस यांनी समोर आणले. डिसेंबरमध्ये धनगर समाजाच्या बाजूने निकाल येणार आहे. धनगर समाजाने जागृत राहावे. पवारांनी एनटी हा नवा प्रवर्ग काढला. संविधानात हा प्रवर्ग आहे का? असा प्रश्न देखील त्यांना यावेळी उपस्थित केला.