अवकाळीचा फटका सामान्यांच्या खिशाला
आगामी तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध, तेल महागणार
औरंगाबाद ः ऑक्टोबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक पाऊस झाला असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुढील किमान तीन महिने धान्याचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे धान्य, भाजीपाला, दूध आणि तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जून-जुुलैमध्ये पेरणीला आलेले धान्य ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणीला येणार होते. परंतु, या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील पावसाने मागील चार वर्षांतील विक्रम ओलांडले आहे. परतीच्या माॅन्सूनचा सर्वाधिक फटका कृषिप्रधान राज्यांना बसला आहे. यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानीमुळे सर्वसामान्यांना भीषण महागाईसाठी तयार राहावे लागण्याचा इशारा स्टेट बँकेच्या “इकोरॅप’ या ३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित अहवालात देण्यात आले. त्यामुळे महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागण्याची चिन्हे आहेत.
सीपीआय ८.४ टक्क्यांवर
धान्यासह भाज्या, दूध, डाळी आणि तेलाचे दर महागाई मोजण्यासाठी वापरला जाणारा ग्राहक मूल्य निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्स-सीपीआय) निर्धारित करतात. हा निर्देशांक वस्तूंच्या किरकोळ दरावरून काढला जातो. ऑक्टोबर २०१९ मध्ये देशात ४४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्या वेळी तीन महिन्यांचा सीपीआय ४.९ टक्क्यांवरून १०.९ झाला होता. या वर्षी ५४ टक्के अधिक पाऊस पडल्याने सप्टेंबरमध्ये ४.९ टक्के असणारा सीपीआय ऑक्टोबरमध्ये ८.४ टक्के झाला आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांत अन्नधान्याचे दर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेकडून वर्तवण्यात आली आहे.