मुंबई | Gram Panchayat Election 2022 – 18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. तसंच आज (20 डिसेंबर) या ग्रामपंचायतींचा निकाल आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच (BJP) बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते काल (19 डिसेंबर) पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा विजय होईल असं म्हटलं आहे. “ग्रामपंचायत निवडणुकांचा उद्या निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भाजपच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी केलेल्या या दाव्यावर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“ग्रामपंचायत निवडणुकाचा दावा कधीच कुणी करू नये. चिन्हावर ज्या निवडणुका लढवल्या जातात तिथे असे दावे केले जाऊ शकतात. ग्रामपंचायत निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात हे काय आम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगायला नको. दावे तुम्ही खुशाल करा”, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी नैरोबी-केनियालाही ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यात. तिथेही हे आमचे लोक निवडून आले असं म्हणतील. उसमें क्या है… महाराष्ट्र, देश या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते नक्कीच लढतात. आपापले पॅनल उभे करतात. कुणी जिंकून येतं, पण ते सोडून द्या”, असंही राऊत म्हणाले.
View Comments (0)