Grandparents Day In School : आता शाळेत साजरा केला जाणार आजी आजोबा दिवस

Grandparents Day In School : सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. परंतु, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही. याच नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी, आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आजी, आजोबा दिवस रविवार, 10 सप्टेंबर रोजी असून त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर या दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही, तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस साजरा करावा, असे शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.