सर्वसामान्यांना फटका! शेंगदाणा, गहू, ज्वारी, तांदळाचे दर वाढले

मुंबई | Maharashtra News – फोडणीच्या जिरे, मोहरी आणि मसाल्यापासून ते गहू, ज्वारीपर्यंत सर्वच अन्नधान्यांचे भाव अवघ्या एका महिन्यातच वाढले असल्याचे दिसून आले आहे. ज्या कुटुंबाचे किराणाचे बजेट अडीच ते तीन हजार रुपये होते, त्यांचे बजेट आता साडेचार हजार रुपयांच्या घरात गेले आहे. यामुळे आता किराणा भरताना सामान्यांना काटकसर तरी नेमकी कुठे करायची, असा प्रश्न पडला आहे.
जसा अधिक महिना सुरू झाला, त्यावेळेपासून किराणा मालाचे दर हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील १५ ते २० दिवसांमध्ये किराणा मालाच्या जिन्नसात मोठी भाववाढ पाहावयास मिळत आहे. डाळीमध्ये ५ ते ६ रुपयांची वाढ होताना दिसत आहे. तांदूळ, पोहे, शेंगदाणे आणि गहू या जिन्नसांमधील भाववाढ ही १० ते २५ रुपयांपर्यंत दिसून येत आहे. अचानकपणे किराणा मालाचे भाव किलोमागे १० ते १५ रुपये वाढल्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या खिशाला जास्तीचा ताण पडत आहे. किराणा सामानाचे बजेट बिघडल्याने महिन्याचा खर्च चालवताना दाम्पत्याच्या नाकीनऊ येत आहेत.