मन सुन्न करणारी घटना! ‘या’ क्षुल्लक कारणामुळे व्यक्तीची कापली जीभ

पुणे | Pune Crime News – आजकाल बऱ्याच लोकांना राग कंट्रोल होत नाही. रागाच्या भरात लोकं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका क्षुल्लक कारणावरून पुण्यातील एका व्यक्तीची चक्क जीभ कापण्यात आली आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना 28 डिसेंबरला घडली आहे.
व्हाॅट्सअप ग्रुपमधून (Whatsapp Group) रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. तसंच या मारहाणीत त्याची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 38 वर्षीय महिलेनं हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत.
सोसायटीतील रहिवाशांचा तक्रारदारांच्या पतीने ‘ओम हाईट्स ऑपरेशन’ या नावानं व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्यही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते. त्यांनी या प्रकरणात आरोपी आहे त्याला ग्रुपमधून काढून टाकले होते. त्यामुळे ग्रुपमधून काढून टाकलेल्या व्यक्तीने मनात संताप व्यक्त करत अॅडमिन असलेल्या व्यक्तीची जीभ कापल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.