सह्याद्रीच्या कुशीतील ‘हडसर किल्ला’

पुणे जिल्ह्याला जसा शैक्षणिक वारसा लाभला आहे. तसेच गडकिल्ल्यांनी नटलेला जिल्हा म्हणूनदेखील पुण्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी किल्ल्यांची रांगच आहे. असाच सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हडसर हा किल्ला आहे. दुर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांसाठी या किल्याने भुरळ घातली आहे. याची उंची ४६७० फूट इतकी असून त्याचे दुसरे नाव पर्वतगडदेखील आहे. या गडाच्या पायऱ्या साधारणपणे ३०० च्या आसपास आहेत. ऐतिहासिक नोंदीनुसार हा किल्ला १६३८ मध्ये शहाजीराजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये होता.
तसेच नाणेघाटाच्या संरक्षणासाठी म्हणून नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला आहे. त्यानंतर १८१८ च्यामध्ये ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्लेदेखील जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्यावर पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यामधील सुरुवातीला किल्ल्यावर जाताना प्रथम लागते ते प्रवेशद्वार. हडसर किल्ल्याची दोन प्रवेशद्वारे आहेत.
त्यानंतर गडावरील मुख्य दरवाजातून वर आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाते. तसेच गडावर पाण्याचे टाके व कातळात कोरलेली कोठारेदेखील आहेत. समोर जी पाण्याचे टाके दिसतात त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. तेथून जरा पुढे गेलो की, खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. त्यानंतर उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. तसेच गडावर महादेवाचे मंदिर आहे. असा निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा किल्ला आहे.
तसेच या गडावर जाण्यासाठी पुण्यातून अनेक मार्ग आहेत. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहोचता येते. हडसर या गावातून गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाजाची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या बांधून काढलेली आहे. राजदरवाजाच्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी हडसर या गावी आधी जावे लागते. मुंबई, ठाणेकडून येणाऱ्यांनी कल्याण – ठाण्यावरून माळशेजमार्गे जाणारी कोणतीही एस. टी. बस पकडावी जसे की, आळेफाटा, ओतूर, जुन्नर, अहमदनगर इ. त्यानंतर ३-४ तास प्रवास करून माळशेज घाट संपल्यानंतर १५-२० मिनिटांवर असलेल्या सीतेवाडी फाट्यावर उतरावे. या हडसर किल्ला तुम्हाला जवळ पडेल. याचप्रमाणे अनेक ट्रेकिंगसाठी जाणारे युवक गडावर जाण्यासाठी खडतर आणि पायवाट शोधून गडावर जातात. यामुळे अनेक दुर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी हा गड नक्कीच आवडता बनला आहे.