ताज्या बातम्यापुणे

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अ‍ॅलर्ट’!आजचे कमाल तापमान ४१ अंशांपुढे

पुणे | पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. उन्हाच्या झळांमुळे सकाळपासूनच हैराण झालेल्या नागरिकांना वाढलेल्या तापमानाने घाम फोडला. उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला ‘यलो अॅलर्ट’चा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उन्हाळा सर्वोच्च अवस्थेत पोहोचला आहे. उत्तर भारत, गंगा नदीचे खोरे, दक्षिण भारतात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला ‘यलो अॅलर्ट’चा इशारा दिला आहे. दरम्यान तळेगाव ढमढेरे येथे ४४, तर शिरूर येथे ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

वातावरणातील घडामोडींमुळे राज्याच्या बहुतांश भागात आलेल्या उष्णतेची लाटेचा फटका पुण्यालाही बसला आहे. त्याचबरोबर राज्यात सोलापूर येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात गेल्या आठवडाभरापासून वाढलेली उष्णता कमी होण्याऐ‌वजी दररोज हंगामातील उच्चांक नोंदवला जात असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा दाह, गरम वाऱ्याचा सामना करत आहेत. किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला आहे.

येत्या पाच मेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी सुट्टी असली, तरी सकाळी साडेदहा ते साडेचार या काळात बाहेर फिरणे टाळावे, असे आ‌वाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये