पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील येवा वाढला असून पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आजमितीला धरणात ५४.१३ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा साठा सहा महिने पुरेल एवढा आहे.
शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची भिती व्यक्त केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील येवा वाढला असून सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
काय आहे धरणातील परिस्थिती?
गेल्या २४ तासात झालेला पाऊस – १४५ मिमी
१ जून पासून झालेले पाऊस – १२२२ मिमी
गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस – १३४२ मिमी
धरणातील सध्याचा पाणीसाठा- ५४.१३ टक्के
गेल्यावर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा – ६१.१२ टक्के