हिजबुल्लाहने इस्रायलवर २५० रॉकेट डागले, सात जण जखमी
हिजबुल्लाहने पुन्हा एकदा इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. रविवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर तब्बल २५० रॉकेट डागले. या हल्ल्यामध्ये जवळपास सातजण जखमी झाले. हिजबुल्लाहने गेल्या काही महिन्यात केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. यातील काही रॉकेट्स इस्रायलच्या मध्य पर्यंत तेल अवीव परिसरापर्यंत पोहोचले.
एकीकडे युद्ध विरामासाठी मध्यस्थांकडून दबाव निर्माण होत असताना हिजबुल्लाहकडून हा भीषण हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलने बेरूतवर केलेल्या हल्ल्याला उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लेबनॉनच्या सैन्याने म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्याने रविवारी एका लेबनॉनी सैनिकाचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी झाले आहेत. यावर इस्रायली सैन्याने खेद व्यक्त केला आहे. यावर इस्रायलने म्हटलंय की, हा हल्ला फक्त हिजबुल्लाहच्या विरूद्ध युद्ध क्षेत्रात केला होता. लष्कराच्या कारवाया फक्त अतिरेक्यांविरुद्ध आहेत.
इस्रायली हल्ल्यात अनेक लेबनॉनी ठार
इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या संघर्षात युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायली हल्ल्यात ४० हून अधिक लेबनॉनी सैनिक ठार झाले आहेत. यावर लेबनॉनचे प्रधानमंत्री नजीब मिकाती यांनी या हल्ल्याची निंदा केली. अमेरिकेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संघर्ष विरामाच्या प्रयत्नांवर हा हल्ला असल्याचे म्हटले आहे. इस्रायली सैन्याने म्हटलंय की, हिजबुल्लाहने जवळपास २५० रॉकेट्स डागले. ज्यातील काही रॉकेट्सना रोखण्यात यश आले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार, इस्त्रायलने बेरूतवर शनिवारी कोणताही इशारा न देता हवाई हल्ला केला यामध्ये २९ लोक ठार झाले तर ६७ लोक जखमी झाले.