लपलेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा यांच्याबाबतचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. ऑडी कारची नोटीस देण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांनाही मनोरमा यांनी वाद घालत दमदाटी केली होती.
मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस खेडकर यांच्या बाणेर येथील निवासस्थानी देखील जाऊन आले होते. परंतू त्या सापडल्या नव्हता.
अखेर मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मनोरमा खेडकर या महाडच्या पाचड येथील हिरकणी गावातील हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. त्यांना तेथून अटक करण्यात आली आहे. मनोरमा यांच्या अटकेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात करून पुणे पोलीस पुण्याकडे येण्यासाठी निघाले आहेत. रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
आता पर्यंत खेडकरांचे काय काय प्रकार समोर आले?
खरेतर मुळशीपासून खेडकरांचे अहमदनगरला असलेले गाव हे सुमारे २५० किमी दूर आहे. पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. हे लायसन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.पूजा खेडकर यांनी खोटी, बनावट कागदपत्रे देऊन आयएएस नोकरी हडपलेली आहे. एसीबीने दिलीप खेडकर यांच्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष घातले असून ते देखील चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण रद्दची कारवाई करण्यात आली आहे. या आठवडाभरात त्यांना मसुरीला हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. यातच मनोरमा यांचा पोलिसांशी मेट्रोच्या कामावरून हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने मनोरमा यांच्या बाणेरच्या बंगल्याच्या समोरील फुटपाथवरील अतिक्रमण तोडले आहे.