नव्या संसद भवनात ठेवणार ऐतिहासिक सेंगोल, अमित शाहांनी दिली माहिती; म्हणाले, “अनेक युगांची परंपरा…”

नवी दिल्ली | Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (24 मे) पत्रकार परिषद घेत नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी माहिती दिली. या नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. यावेळी ऐतिहासिक राजदंडाचे पुनर्जिवन करण्यात येणार असून या राजदंडाला सेंगोल असं म्हणतात. या सेंगोलचा वापर सर्वात आधी ऑगस्ट 1947 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. या सेंगोलचं महत्त्व आज अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अमित शाह यांनी सांगितलं की, “नव्या संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसंच या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या 60 हजार कामगारांनी योगदान दिलं आहे, त्या कामगारांचा देखील पंतप्रधान मोदी सन्मान करणार आहेत.”
“या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ऐतिहासिक परंपरेचे पुनर्जिवन करण्यात येणार आहे. कारण, या दिवशी संसद भवनात पारंपरिक राजदंड असलेले सेंगोल कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे. सेंगोल या राजदंडाला अनेक युगांची परंपरा आहे. तसंच या पारंपरिक भारतीय राजदंडाला तामिळमध्ये सेंगोल असं म्हणतात. सेंगोलचा अर्थ संपदेतून संपन्न असा होता”, असं अमित शाह म्हणाले.
“ज्या दिवशी राष्ट्राला संसद समर्पित केले जाणार आहे, त्या दिवशी हे सेंगोल तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. त्यानंतर संसदेत हे सेंगोल कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे”, अशी माहिती अमित शाहांनी दिली.
दरम्यान, भारत देशानं स्वातंत्र्य मिळवल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारण्यात आलं होतं की, सत्ता हस्तांतरणाबाबत काय कार्यक्रम आहे? त्यावेळी नेहरूंनी सत्ता हस्तांतरणाबाबत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सेंगोलच्या प्रक्रियेला चिन्हित केलं गेलं होतं. पंडित नेहरूंनी सेंगोलला तमिळनाडूहून मागवंल होतं. त्यानंतर इंग्रजांकडून सेंगोल राजदंड स्वीकारून त्यांनी सत्ता स्थापन केली होती.