बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; बसखाली चिरडून 3 ठार
सोलापूर | Accident News : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात तीन तरूण गाडीखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिनही तरूण धाराशिव येथील होते. हा मोठा अपघात काल संध्याकाळच्या सुमारास झाला.
बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे हा अपघात घडला आहे. धाराशिव येथे राहणारे तीन तरूण बार्शीकडे निघाले होते. त्यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि तरूणांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तिन्ही तरूण एसटी बसखाली चिरडले. त्यातील एका तरूणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर बाकी दोघंजण जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले.
ओम आतकरे, कार्तिक यादव, ओंकार पवार अशी मृत तरूणांची नावं आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडी येथील ग्रामस्थ मदतीला धावून आले. तर बसमधील काही जखमी प्रवाशांना तातडीनं उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.