घरच्याघरी हॅलोविन पार्टीची करा झटपट तयारी
Halloween 2023 : आजकाल सोशल मीडिया, हॉलिवूड सिनेमा, वेबसीरीज याच्या माध्यमातून हॅलोवीन बद्दल पाहायला मिळते. त्यामुळे भारतीयांच्या मनातही हॅलोवीन बाबत उत्सुकता वाढली आहे. अत्यंत विचित्र, भूता-खेतांच्या वेशभूषेत अनेकजण तयार होऊन या हॅलोविन पार्टीमध्ये सहभागी होतात असे दृश्य आपण पाहतो. भारतीय संस्कृतीत जितके महत्त्व पितृपक्षाला आहे तितकेच ख्रिस्ती धर्मात हॅलोविनला. हॅलोविन हा ख्रिस्ती धर्मात पितरांचे स्मरण करण्यासाठी साजरा करणारा दिवस असतो. दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन साजरे केले जाते. भारतात देखील शाळांमध्ये, ऑफिसमध्ये, बॉलीवूड किंवा अगदी घरोघरी हॅलोवीन पार्टीचे आयोजन केले जाते. या दिवशी लोक भितीदायक कपडे घालून त्याचप्रकरचा मेकअप देखील करतात. तुम्हीही हॅलोवीन पार्टी करण्याचा विचार करत असाल तर झटपट पद्धतीने करा नियोजन.
पार्टीसाठी थीम सेट करा
सर्वात प्रथम हॅलोवीन पार्टीसाठी स्वतःची एक थीम सेट करा. हॅलोविन सेलिब्रेशनमध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. मग त्यानुसार घराचे डेकोरेशन, खाण्या-पिण्याच्या गोष्टी सेट करा. सर्वात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना ठरलेल्या थीमची कल्पना देऊन त्यांना सुद्धा ती थीम फॉलो करण्यास सांगावी.
पाहुण्यांची यादी
कोणतीही पार्टी म्हटलं की सर्वात आधी पाहुण्यांना बोलवावे लागते. पाहुण्यांना बोलावण्यासाठी सर्वात आधी त्यांच्या नावांची यादी करणे गरजेचे आहे. यादी केल्याने काम सोपे होईल. कमी वेळात कॉल करून बोलावणे शक्य नाही मग अशावेळी घरच्याघरी थीमवर आधारित इनविटेशन कार्ड बनवून पाहुण्यांना आमंत्रित करा.
प्लेलिस्ट तयार करा
कोणताही समारंभ संगीताशिवाय अपूर्ण आहे, त्यात पार्टी म्हटली की म्युजिक आलेच. परंतु ही पार्टी हॅलोवीन पार्टी असल्यामुळे यासाठी थीमवर आधारित शैलीतील गाणे असावेत. त्यामुळे सर्वात आधी अशा गाण्यांची प्लेलिस्ट तयार करा. पार्टीमध्ये हॅलोवीन थीमचा उत्साह वाढवण्यासाठी थरारक किंवा नाटकीय साऊंडट्रॅक जोडा.
पार्टी मेनू
हॅलोवीन सेलिब्रेशनमध्ये भोपळ्याला विशेष असे महत्व असल्याने भोपळ्याच्या आकाराची भांडी, प्लेट्स याचा वापर करता येऊ शकतो किंवा भोपळा कोरून या गोष्टी बनवता येऊ शकतात. पार्टीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेनू. मेनू निवडताना पण थीम फॉलो करा. स्पायडर कुकीज, मॉन्स्टर ब्रेन कपकेक अशा पदार्थांची निवड करा.