जळालेली भांडी चकाचक करण्यासाठी घरगुती टिप्स
किचन म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे किचनमध्ये स्वयंपाक करताना महिला अनेक गोष्टींची काळजी घेतात. त्यात सर्वात जास्त स्वयंपाक केल्यानंतर काळवंडलेली भांडी साफ करणं हा महिलांसाठीचा सर्वात चिंतेचा विषय असतो. अशावेळी करपलेली, जळलेली जर एखादी कढई असेल तर खूप मोठा ताण महिलांना होतो. अशा करपलेल्या भांड्यांना कसं स्वच्छ करायचं हा प्रश्न अनेक गृहिणींनी पडतो. त्यामुळं स्वयंपाक करताना जळून काळी झालेल्या भांड्यांना चकचकीत साफ आणि स्वच्छ कसे करायचे, त्यासाठी काही घरगुती टिप्स.
ॲल्युमिनियमची भांडी
स्वयंपाकघरातली अॅल्युमिनिअमची कढई असो किंवा कुकर, पातेलं असो, अॅल्युमिनियमच्या भांड्यांची चमक वारंवार वापरल्यानंतर खूप लवकर निघून जाते. अशा परिस्थितीत, ते स्वच्छ करण्यासाठी भांडं गॅसवर ठेवा आणि त्यात पाणी घाला. पाणी उकळल्यानंतर आता त्यात दोन चमचे मीठ आणि एक टेबलस्पून डिटर्जंट पावडर घाला. भांडं खूपच काळं झालं असेल, तर तुम्ही त्यात अर्ध्या लिंबाचा रसदेखील घालू शकता.
काचेची भांडी
घरातली काचेची भांडी आणि चिनी मातीची भांडी स्वच्छ करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. व्हिनेगार, पाणी आणि डिश वॉश साबणाचं मिश्रण करून काचेची आणि चिनी मातीची भांडी साफ करता येतात. काचेच्या वस्तूंवरचे डाग काढायचे असतील तर त्यात व्हिनेगार, पाणी आणि डिश वॉश साबणाचे मिश्रण थोडा वेळ घालून ठेवावं. भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी कोमट असेल याची काळजी घ्या.
स्टीलची भांडी
स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवर गंज, तपकिरी डाग किंवा करपलेले डाग असल्यास, ते काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. काहीवेळा खाऱ्या पाण्यामुळे स्टीलच्या भांड्यांवर थर गोठण्यास सुरुवात होते, ज्यामुळे ते खराब किंवा काही काळानंतर ते जुने दिसू लागतात. यासाठी एका भांड्यात २ चमचे व्हिनेगर मिसळा आणि अर्धा तास भांड्यांवर सोडा. यानंतर, भांडी डिशवॉशने नीट धुवा आणि पुसून टाका.