“मी भाजपची आहे पण भाजप थोडीच…”, पंकजा मुंडेच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | Pankaja Munde – भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्षाबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला कशाचीच भीती वाटत नसून भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. तसंच मी भाजपची आहे पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे. असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत आज (1 जून) राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही म्हणत आहात ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. त्यामुळे मी भाजपची होऊ शकते पण तो पक्ष माझा होऊ शकत नाही.
मला कशाचीही भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तात आहे. कसलीही चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन आणि महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.