“धोनी कर्णधार नसेल तर सीएसके संघात…”, भारतीय दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

मुंबई | MS Dhoni – कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) आयपीएल कारकिर्दीतील हा शेवटचा हंगाम असणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अशातच या सीझनमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाल्यामुळे धोनी पुढच्या सीझनमध्येही खेळू शकतो असं म्हटलं जातंय. या दरम्यान, माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागनं धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘क्रिकबझ’वर बोलताना सेहवाग म्हणाला की, जर तुम्ही तंदुरस्त असाल तर 40 व्या वर्षी क्रिकेट खेळणं अवघड नाही. यावर्षी धोनीनं फारशी फलंदाजी केलेली नाही. कारण तो त्याच्या गुडघ्याची दुखापत वाढवत नाही. अनेकवेळा तो शेवटच्या दोन षटकांत खेळायला येतो. तसंच या मोसमात त्यानं खेळलेले सर्व चेंडू जोडले तर ते 40-50 होतील.
पुढे सेहवागनं खेळाडूंच्या इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाबद्दल आणि ते धोनीसाठी चांगलं का नाही याबाबत सांगितलं. सेहवाग म्हणाला, धोनीला इम्पॅक्ट प्लेयर लागू होत नाही. कारण तो कर्णधारपदासाठी खेळत असून त्याला कर्णधारपदासाठी मैदानात उतरावं लागेल. तसंच इम्पॅक्ट प्लेअरचा नियम हा अशा व्यक्तीसाठी असतो जो क्षेत्ररक्षण करत नाही तर तो फलंदाजी करतो किंवा त्या गोलंदाजाला फलंदाजी करण्याची आवश्यकता नाही. तर धोनी जर कर्णधार नसेल तर तो सीएसके संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही नसेल.