शौक बडी चीज है! पठ्ठ्या दुचाकी चोरायचा पण विकत नव्हता, कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar Crime News – स्वत:चा छंद पूर्ण करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. असाच एक चकीत करणारा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar City) पोलिसांनी पकडलेल्या एका चोराची कहाणी ऐकून पोलीसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. कारण, हा चोर शौक म्हणून दुचाक्या चोरायचा पण, त्या दुचाकी तो विकत नव्हता तर जमा करून ठेवायचा. तसंच पोलिसांनी या चोराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
शिवाजी भिकनराव चव्हाण (वय 50 वर्षे) असं या चोराचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचं पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना एन-12, हडको, छत्रपतीनगर येथे भालेराव यांच्या पिठाच्या गिरणीमागे एका रिकाम्या प्लॉटवर काही दुचाकी उभ्या असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकानं तेथे जाऊन तपास केल्यानंतर या चोरीच्या दुचाकी असल्याचं चौकशीत समोर आलं. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी चव्हाणला ताब्यात घेतलं आहे.
गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी शिवाजी चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एकूण 9 चोरीच्या दुचाकी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 6 दुचाकीचे गुन्हे दाखल आहेत. पण, शिवाजी हा चोरी केलेल्या दुचाकी कधीच विकत नव्हता. याचं कारण म्हणजे तो दुचाकींची चोरी पैश्यांसाठी नव्हे तर, तर फक्त त्याचा शौक म्हणून करायचा. पोलिसांना हे कळल्यानंतर त्यांना देखील मोठा धक्का बसला होता.