कर्वेनगरमध्ये मध्यरात्री घरात घुसून एकाचा केला खून
पुण्यात कर्वेनगरमध्ये एका व्यक्तीचा त्याच्या घरात घुसून मध्यरात्री खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे . राहुल पंढरीनाथ निवगुणे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कर्वेनगरमधील उच्चभ्रू अशा श्रीमान सोसायटीत ते राहत होते. मध्यरात्री एक वाजता बुरखा घातलेल्या व्यक्तीने घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करत त्यांचा खून केला. कुटुंबियासमोरच ही हत्या त्या व्यक्तीने केली. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन तो प्रसार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री एकच्या सुमारास अज्ञातांनी राहुल यांच्या घराचा दरवाजा वाजवला. कुणीतरी दरवाजा वाजवतंय असं कळताच राहुल यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर आऱोपींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. यावेळी राहुल यांनी आरडाओरडाही केला. तेव्हा घरात पत्नी आणि तीन मुली होत्या. आवाजाने त्या जाग्या झाल्या आणि राहुल यांच्या दिशेने धावल्या.
पत्नी आणि मुली पोहोचेपर्यंत आरोपीने राहुल यांच्यावर सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपीने घरातले दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तू घेऊन तिथून पळ काढला. डोळ्यादेखत वडिलांची हत्या झाल्यानं मुलींना मोठा धक्का बसला आहे.