विराट, रोहितला यापुढे टी-20 संघात स्थान मिळणार नाही? बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, “पुढील वर्षी…”

नवी दिल्ली | Team India – विरोट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुढील दोन वर्षांत भारतीय टी-20 संघांमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच पुढील दोन वर्षांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंना टी-20 संघातून वगळण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांना पुन्हा क्रिकेटमधील सर्वात छोट्या प्रकारामध्ये संधी मिळणाची शक्यता आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 मधील त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा निराश झाला होता. तसंच तो डोळे पुसत असल्याची दृश्य कॅमेरात कैद झाली. यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याला धीर देण्याचं काम केलं. सामना संपल्यानंतर राहुल द्रवीडनेच पत्रकार परिषद घेतली होती.
“बीसीसीआयनं कधीच कोणाला निवृत्त होण्यास सांगितलं नाही. निवृत्तीचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक असतो. मात्र 2023 मध्ये भारतीय संघ टी-20 चे मोजकेच सामने खेळणार आहे. त्यामुळे यापुढे अनुभवी खेळाडूंचा विचार एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी केला जाईल”, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. “इच्छा नसेल तर खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करण्याची गरज नाही. मात्र, पुढील वर्षी तुम्ही त्यांना नक्कीच टी-20 सामने खेळताना पाहणार नाही”, अशी माहितीही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.