भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाचे उद्घाटन; पर्यटनस्थळ म्हणून मिळणार नवी ओळख

पुणे : ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला कळेल. तसेच हे भवन एक पर्यटनस्थळही म्हणून ओळखले जाईल, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले.
काय आहे या भवनात नक्की?
क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या या भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची पेटी व वाड्याला असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टीम इत्यादी आकर्षणांबरोबरच पर्यटकांसाठी ऑडिओ व व्हिडीओ क्लिपही असणार असून हे भवन सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे.
‘इंद्राणी बालन फाउंंडेशन’द्वारे नूतनीकरण करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध ब्लॉगर व शेफ जुगनू गुप्ता, मंडळाचे उत्सवप्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, आरएमडी फाउंंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी गुप्ता म्हणाले, वर्षभरापूर्वी मी हे भवन पाहिले होते, आता नूतनीकरणानंतर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशी ही वास्तू झाली आहे. जेव्हा पर्यटक शनिवारवाडा व इतर गोष्टी पाहण्यासाठी पुण्यात येतील, तेव्हा हे भवनही पाहायला नक्की येतील. हे पण एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा जो इतिहास आहे आणि क्रांतिकारकांनी जी काही कामगिरी केली हे नव्या पिढीला या माध्यमातून कळणार आहे.
देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारकांनी केलेली चळवळ या भवनातून सुरू केली होती. जवळपास १४० वर्षे जुने असलेले हे भवन नूतनीकरण करण्याची गरज होती. त्यानुसार ‘इंद्राणी बालन फाउंंडेशन’ने पुढाकार घेऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’समवेत या भवनाचे नूतनीकरण केले, याचे समाधान आहे.
— पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त
धार्मिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेल्या या भवनाचे नूतनीकरण केल्याबद्दल पुनीत व जान्हवी बालन आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. तसेच असेच चांगले सामाजिक काम आपल्याकडून होईल अशी अपेक्षाही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.