पुण्यातील खड्डे उठले नागरिकांच्या जिवावर! अनेक जण गंभीर जखमी
शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये आणि रस्त्यांवर जागोजाग खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांवरून राजकारण देखील तापलेले आहे. या खड्ड्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्चदेखील झालेला आहे. आता हेच खड्डे नागरिकांच्या जिवावर उठू लागले आहेत.
खड्ड्यात गाड्या आदळल्याने चालकांच्या मणक्याला हादरा बसून कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या या तीन अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकांनी ‘सीविक मिरर’कडे आपबिती व्यक्त केली. यातील एका नागरिकाच्या चेहऱ्याला फ्रॅक्चर झाले असून दुसऱ्या नागरिकाच्या उजव्या बाजूच्या दंडाचे हाडच तुटले आहे. तिसऱ्या अपघातात एका वकिलाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुणे महापालिकेकडून मात्र पावसावर खापर फोडून आपल्या कामाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बिबवेवाडी येथील प्रसन्न सोसायटीत राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाचा टिळक चौकाजवळ ४ ऑगस्ट रोजी दुपारी अपघात झाला. या तरुणाचा शहराच्या मध्यवर्ती भागात रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते कामानिमित्त टिळक चौकामधून जात होते. चौकाच्या थोडे पुढे आल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे पुढील चाक आदळले. ही गाडी एवढ्या जोरात खड्ड्यात आदळली की हा तरुण उडून खाली पडला. त्याच्या उजव्या हाताला त्याचा जोरदार हिसका बसला. हातावर पडल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाचे हाड मोडले. असह्य वेदनेने ते जागेवरच विव्हळत पडले. स्थानिकांनी त्यांना उचलून बाजूला नेले. तसेच, त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून हाताला प्लास्टर घालण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना तीन महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सहकारनगर येथे राहणाऱ्या सोमनाथ बिर्ला (वय ५६) यांचाही दुचाकी खड्ड्यात पडल्याने अपघात झाला. बिर्ला यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले, की ते ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून सहकारनगरमधील घराकडे निघाले होते. पर्वतीकडून लक्ष्मीनगरमधील रस्त्याने सहकारनगरकडे जात असतानाच समोरून एक कार आली. त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या खड्ड्यात पाणी भरलेले असल्याने तो त्यांना दिसलाच नाही.ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. खड्ड्याच्या कोपऱ्यावर त्यांचा चेहरा आदळला. त्यामुळे त्यांच्या डोळ्याखालील हाडाला जबर इजा झाली.
या अपघातात चेहऱ्यावरील हाडाला तीन ठिकाणी क्रॅक आल्याचे बिर्ला यांनी सांगितले. त्यांचा चष्मा तुटून त्याची काडीदेखील डोळ्याखाली घुसली. त्यांना रात्रीच्या अंधारात काय करावे सुचत नव्हते. पाऊस पडत असल्याने लवकर उठता येत नव्हते. चेहऱ्यावर, नाकाला, गुडघ्याला आणि हाताला मुका मार लागला होता. स्थानिकांनी त्यांना आधार देत घरी पोहोचवले. सुदैवाने त्यांचा डोळा वाचला. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ते घरीच उपचार घेत आहेत.
भर पावसात खड्डे बुजवणे पडले महागात
शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांवरून नागरिक संतापल्यावर पालिकेच्या पथ विभागाने भर पावसात खड्डे बुजवण्याचा पराक्रम केला. त्यामुळे डांबर, खडी, कॉंक्रिट तग धरू शकले नाही. पाऊस उघडताच ही खडी रस्त्यावर पसरू लागली. त्यामुळे वाहने घसरून अपघात घडू लागले आहेत. यासोबतच खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यामुळे तसेच रात्रीच्या अंधारात खड्डे न दिसल्याने त्यामध्ये दुचाकी आदळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या अपघातांना चारचाकी वाहनेदेखील अपवाद राहिलेली नाहीत. मात्र, दुचाकीस्वारांच्या तुलनेत चारचाकीमधून प्रवास करणाऱ्यांना कमी त्रास होतो. परंतु, मणक्याचे आणि हाडांचे आजार, पाठदुखी, कंबरदुखीचे आजार असलेल्या नागरिकांना खड्ड्यांचा हा दणका सहन होत नाही. दुचाकी खड्ड्यात आदळल्याने चालक रस्त्यांवर आपटतात. दुचाकी घसरून पडते. वाहनांचे नुकसान होते ते वेगळेच. वाहनचालकांना हाड मोडणे, मणक्याला दुखापत होणे, खरचटणे याला तोंड द्यावे लागते. डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो तो वेगळाच. गंभीर दुखापत झाल्याने अनेकांना रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घ्यावी लागत आहे.
One Comment