खाद्यप्रेमींच्या खिशाला झळ, सर्वसामान्यांचा ‘बर्गर’ महागला
मुंबई | Vada pav – सध्या देशात सगळ्याच वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली असल्यानं त्याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे. महागाई आवासून उभी असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं असह्य झालं आहे. तर आता सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा आवडता पदार्थ म्हणजे वडापावच्या (Vada pav) किंमतीत देखील वाढ होणार आहे. कारण पावाच्या दरात वाढ झाल्यानं आता वडापावचा भाव देखील वाढणार आहे. तसंच पावसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार असून पाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमतीत देखील वाढ झाली असल्यानं पावचे दर वाढणार आहेत. त्यामुळेच याचा थेट परिणाम वडापाववर पडणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरांमध्ये अनेक लोक रोजगाराच्या, शिक्षणाच्या,व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत राहातात. तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा वडापाव आता महागणार असल्याची दाट शक्यता सांगितली जाते. मुंबईच्या लोकांना जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो वडापाव. कारण 10 रुपयांमध्ये विकला जाणारा आणि सर्वसामान्य लोकांच्या भुकेला साथ देणारा वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील वडापावच्या किंमत वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा किंमतीत वाढ होणार आहे. याचप्रमाणे आतापर्यंत पावाचा दर साधारणत: 2 रुपये प्रति पाव असा होता. यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. परंतु आता उत्पादन खर्चच प्रति पाव 2 रुपये झाला असल्यामुळे पावाची किंमत वाढली आहे. आता 3 रुपयांपर्यंत पावाची किंमत वाढविण्यात आली आहे. सहा पावांची लादी आता 12 ऐवजी 16 रुपयांना मिळणार असून विक्रेते आता ही लादी 24 ते 26 रुपयांना विकू शकतात. यामुळे सर्वसामान्यांची कोंडी होणार आहे. यामुळे जर असे झाले तर वडापावचे भाव सुद्धा वाढणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी याच वडापावचा दर 2 रुपये होता त्यानंतर 5 रुपये झाला. तसंच गेल्या पाच वर्षांमध्ये हाच वडापाव 10 ते12 रुपये झाला. जसजसे खाद्य तेलाचे दर वाढत गेले तसंच याच वडापावमध्ये 15 ते 20 रुपये अशा दरात वाढ झाली आहे. यामुळे आता नक्की याच वडापावची किंमत किती मोजावी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.