20 वर्षाने टीम इंडिया इंग्लंडची मुजोरी मोडून काढणार? नाणेफेक जिंकून बटलरने घेतला फलंदाजीचा निर्णय
लखनऊ : (IND vs ENG World Cup 2023) रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज आपला वर्ल्डकपमधील सहावा सामना खेळणार आहे. भारताने आतापर्यंतचे आपले पाचही सामने जिंकून 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र आज भारताचा सामना हा गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. गतविजेत्यांना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त एकच सामना जिंकण्यात यश आले आहे.
मात्र भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. न्यूझीलंडप्रमाणेच भारताला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडदेखील कायम जड गेलं आहे. गेल्या 20 वर्षात भारत इंग्लंडला वर्ल्डकपच्या सामन्यात हरवू शकलेला नाही. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारत – इंग्लंड सामना टाय झाला होता.
भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्धचा वर्ल्डकप विजयाचा 20 वर्षापासून सुरू असलेला दुष्काळ संपवला होता. आता अशाच प्रकारे इंग्लंडविरूद्धचा देखील वर्ल्डकमधील 20 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे.
इंग्लंड जरी गतविजेता असला तरी भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्रजांची अवस्था खराब झाली आहे. त्यांना पाच सामन्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे भारत – इंग्लंड सामन्यात भारतीय संघाचेच पारडे जड आहे.