रोहितसेनेचा आठवा प्रताप! दक्षिण आफ्रिका 83 धावांत गारद, भारताचा 243 धावांनी ऐतिहासिक विजय
IND Vs SA, World Cup 2023 : भारताने विश्वचषकात सलग आठव्या विजयाची नोंद केली. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी विराट पराभव केला. रवींद्र जाडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने जबराट फिनिशिंग केले, त्यानंतर गोलंदाजीत त्याने पाच विकेट्स घेतल्या. विराट कोहलीने 49 वे वनडे शतक ठोकले. त्याशिवाय श्रेयस अय्यरने अर्धशतकही ठोकले. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने दिलेल्या 327 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. भन्नाट फॉर्मात असेलला क्विंटन डिकॉक अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफाळाचीत बाद केले. त्यानंतर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. 40 धावांवर आफ्रिकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. जाडेजा आणि शामी यांच्या माऱ्यापुढे आफ्रिकेने गुडघे टेकेले. टेम्बा बवुमा याने 11 धावा जोडल्या. रासी डुसेन याने 13 धावा केल्या. त्याशिवाय मार्के यान्सन याने 14 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 15 धावसंख्याही ओलांडता आली नाही. मार्को यान्सन याने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली. क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि एनगिडी यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. टेम्बा बवुमा 11, डुसेन 14 आणि मार्को यान्सन 14 यांनाच फक्त दुहेरी धावसंख्या ओलांडता आली. स्पर्धेत तुफान फॉर्मात असणारी आफ्रिकेची फलंदाजी भारताच्या माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरली.