ताज्या बातम्यापुणे

‘इंडिया टेक टॅलेंट लीग 2023’ मध्ये 100 हून अधिक कंपन्या आणि संस्थांचा सहभाग

पुणे | “कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय), ऑटोमेशन, डेटा सायन्स, चॅट जीपीटी, मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक रोजगारांवर परिणाम होत असला, तरी नवतंत्रज्ञानाशी संबंधित रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. रोजगाराच्या या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी, कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञानाधारित नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःला अद्ययावत ठेवावे,” असा सल्ला माजी विशेष मुख्य सचिव व आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. जे. ए. चौधरी यांनी दिला.

माय ॲनाटॉमी, बंगळुरू व बीडब्ल्यू पीपल यांच्यातर्फे पुण्यातील हॉटेल हयात रिजन्सी येथे आयोजित ‘इंडिया टेक टॅलेंट लीग 2023’ या एक दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चौधरी बोलत होते. प्रसंगी बिटवाईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्वनित मलानी यांचे ‘डिस्ट्रप्शन टू इनोव्हेशन’ यावर व्याख्यान झाले. माय ॲनाटॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय कुमार दास आदी उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत चर्चासत्र, प्रश्नमंजुषा स्पर्धा, राउंड टेबल कॉन्फरन्स, पुरस्कार व सन्मान करण्यात आले.

डॉ. जे. ए. चौधरी म्हणाले, “भारतामध्ये स्टार्टअप संस्कृती वाढत आहे. नवीन प्रगत तंत्रज्ञान उदयास येत आहे. या सर्वात पुण्याचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. भारतीय स्टार्टअप्सने एआय व इतर नवतंत्रज्ञानाची भीती बाळगू नये. उलट या संधीचा उपयोग करून घेत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. ‘एआय’मुळे काही प्रमाणात रोजगार जाणार असले, तरी या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कौशल्य आत्मसात केली, तर मोठ्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत नाविन्यपूर्ण, कौशल्याभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे.”

ध्वनित मलानी म्हणाले, “नव्या शक्तिशाली तंत्रज्ञानामुळे सगळ्याच क्षेत्रात बदल होत आहेत. ‘एआय’चा सुयोग्य वापर करून त्याला अर्थपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तांत्रिक युगात अनेकांना विविध प्रश्न पडलेले आहेत. आपल्याला असलेली माहिती आणि गुगल देणारी माहिती यातील तफावतीमुळे ‘एआय’चा स्वीकार आपल्यासाठी कठीण वाटत आहे. परंतु, हेच तंत्रज्ञान विकास आणि व्यवसाय वृद्धीसाठी कसे महत्वपूर्ण आहे, हे समजून घ्यावे. विद्यापीठांनी अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय यांसारख्या नवतंत्रज्ञानाचा समावेश करावा.”

‘एआय’ व ऑटोमेशनमुळे होणारे बदल आणि शिक्षणातील पुनर्रचना या विषयावर झालेल्या चर्चासत्रात सॉफ्टडेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख, युएसटीचे संचालक अश्विनी सिंग, टेक महिंद्राचे सीटीओ हसीत त्रिवेदी, सिंक्रोचे उपाध्यक्ष रवी मोटवानी, जेड ग्लोबलचे चीफ डिलिव्हरी ऑफिसर अरुण मेनन, फ्लेक्ससीचे संस्थापक गिरीश कुकरेजा, सिक्लोरचे वरिष्ठ संचालक निलेश भोजानी यांनी भाग घेतला. माय अनाटॉमीचे संचालक हरेश पटेल यांनी चर्चासत्राचे संचालन केले.

‘एआय व ऑटोमेशन काळातील रोजगार आणि भविष्यातील शिक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात जेड ग्लोबलचे उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, क्लाऊडमोयोच्या उपाध्यक्षा मंजिरी पटेल शिंदे, सिमेन्सचे टॅलेंट हेड अजय कृष्णकुट्टी, सीडीके ग्लोबलचे वरिष्ठ संचालक जॉय जॉर्ज बीएनवाय मेलनचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, सॉफ्टडेलच्या संचालक (एचआर) पल्लवी शहा, सकाळ मीडिया ग्रुपच्या एचआर हेड तुलसी दौलतानी यांनी आपले विचार मांडले. जीएस लॅब्सचे संचालक (एचआर) प्रताप पवार यांनी चर्चासत्राचे संचालन केले.

यावेळी डॉ. चौधरी यांच्या हस्ते ‘ध्रुवतारा’ पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. अशा प्रकारच्या विचारमंथनातून उद्योग, शिक्षण संस्था यांच्यातील संवाद व समन्वय अधिक वाढून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शिक्षण, कौशल्य तरुणांना देणे शक्य होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. ‘टॅलेंट, टेक्नॉलॉजी, ट्रान्सफॉर्मेशन’ ही त्रिसूत्री घेऊन इंडिया टेक टॅलेंट लीग 2023 देशातील विविध शहरात होत आहे. याआधी हैदराबाद व बंगळुरू येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे चिन्मय कुमार दास यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये