रिंकू – जितेशची फटकेबाजी, कांगारूंसमोर 175 धावांचे आव्हान
India Vs Australia 4th T20I : भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. भारताकडून रिंकू सिंहने दमदार फलंदाजी करत 46 धावा केल्या.
तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी देखील अनुक्रमे 37 आणि 32 धावांचे योगदान दिले. स्लॉग ओव्हरमध्ये जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा चोपत भारताची धावगती वाढवली.
चौथ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिले षटक जवळपास निर्धाव टाकले. यशस्वी जयस्वालच्या 6 षटकात शुन्य धावा झाल्या होत्या.
मात्र त्यानंतर त्याने आपला गिअर बदलला अन् पॉवर प्लेमध्ये भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. या अर्धशतकी सलामीत यशस्वीच्या 37 तर ऋतुराजच्या 7 धावांचे योगदान होते. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी बाद झाला.
यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर 8 तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 1 धावांची भर घालून माघारी परतले. भारताची अवस्था बिनबाद 50 वरून 3 बाद 63 धावा अशी झाली. सामन्याच्या नवव्या षटकातच फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंह आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला.
हा डाव सावरण्याच्या नादात रनरेट थोंड सुस्त पडलं होतं. मात्र 12 व्या षटकानंतर रिंकू आणि ऋतू गायकवाडने गिअर बदलला. रिंकूने रायपूरच्या मोठी बाऊड्री असलेल्या स्टेडियममध्ये देखील लांब – लांब षटकार मारत आपला दम दाखवला.
मात्र 14 व्या षटकात ऋतुराज 32 धावा करून बाद झाला. आता सर्व मदार ही रिंकू सिंहवर होती. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या जितेश शर्माने ही जबाबदारी वाटून घेत ऑस्ट्रेलियाची पहिल्या चेंडूपासून धुलाई करण्यास सुरूवात केली.
या दोघांनी 18 व्या षटकात संघाचे दीडशतक ठोकले. दरम्यान, रिंकू आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. या दोघांनी 32 चेंडूत 56 धावांची भागीदारी रचली. मात्र डावाचे 19 वे षटक सुरू असताना जितेश शर्मा 19 चेंडूत 35 धावा करून बाद झाला.
त्यानंतर रिंकू देखील शेवटच्या षटकात 46 धावांवर बाद झाला.