अहमदाबाद : (India VS New Zealand 3rd T20) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहदमाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचे 99 धावांचे आव्हान रडत खडत का होईना पार करत मालिकेत बरोबरी साधली होती. आता तिसरा सामना जिंकून भारत मालिका विजय साकरणार का हे पहावे लागले.
हार्दिक पांड्याने तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी आपल्या संघात एकच बदल केला आहे. हा बदल फलंदाजीत झाला नसून गोलंदाजीत झाला आहे. त्याने युझवेंद्र चहलच्या ऐवजी उमरान मलिकला संघात स्थान दिले आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताला दुसऱ्याच षटकामध्ये इशान किशनच्या पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी आणि सलामीवीर शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला अर्धशतकी मजल मारून दिली.
इशान किशन 3 चेंडूत अवघी एक धाव करुन बाद झाला. तर 9 व्या षटकात आक्रमक खेळी करणारा राहुल त्रिपाठी 22 चेंडूत 44 धावा करुन माघारी परतला. सध्या शुभमन गिल 36 चेंडूत 51 धावांवर नाबाद खेळत आहे तर त्याला सुर्यकुमार यादव 11 चेंडूत 18 धावांवर नाबाद साथ देत आहे.