किंग कोहलीचा ‘विराट’ पराक्रम, अय्यरकडून धुलाई, आफ्रिकेसमोर भारताचे 327 धावांचे आव्हान
कोलकत्ता : (India Vs South Africa World Cup 2023) विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने आफ्रिकेविरोधात 326 धावांचा डोंगर उभारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 326 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याशिवाय अय्यरने 77 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने जबराट सुरुवात दिली तर रवींद्र जाडेजाने फिनिशिंगट टच दिला. ईडन गार्डन मैदानावर आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचे आव्हान आहे.
विराट कोहलीकडून सचिनच्या शतकांची बरोबरी
रनमशी विराट कोहलीने ईडन गार्डन मैदानावर शतक ठोकले. या शतकासह विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. विराट कोहलीने अवघ्या 277 डावात 49 वे वनडे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला 49 वनडे शतकांसाठी 452 डाव लागले होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश आहे.
श्रेयस अय्यरचे शानदार अर्धशतक
शुभमन गिल बाद झाल्यानंतर अय्यर मैदानावर आला. पण सुरुवातीला आफ्रिकन माऱ्यापुढे अय्यर चाचपडला. 30 धावा काढल्यानंतर अय्यरने फक्त दहा धावा केल्या होत्या. पण जम बसल्यानंतर अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने 87 चेंडूत 77 धावांची झंझावती खेळी केली. अय्यरने विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. अय्यरने आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले. अय्यर आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 158 चेंडूत 134 धावांची भागीदारी झाली.यामध्ये विराट कोहलीचा वाटा 49 तर अय्यरचा वाटा 77 इतका होता.
रोहितची वादळी सुरुवात, पण गिलने नांगी टाकली –
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भाराचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच आफ्रिकन गोलंदाजांविरोधात हल्लाबोल केला. रोहित शर्माने गिलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 35 चेंडू 62 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत वेगाने धावसंख्या वाढवली. रोहित शर्माने अवघ्या 24 चेंडूमध्ये 40 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या संथ झाली. त्यातच शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिल याला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन गिल 24 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. गिल याने या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला. गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताच्या धावांची गती अतिशय संथ झाली. दहा षटकात फक्त एक चौकार मारता आला होता. पण त्यानंतर अय्यर आणि कोहलीने वेगाने धावा काढल्या.
सूर्या-जाडेजाचा फिनिशिंग टच
सूर्यकुमार यादव याने फिनिशिंगचा प्रयत्न केला, पण मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादवने पाच चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. सूर्यकुमार आणि विराट कोहली यांच्यामध्ये 24 चेंडूत 36 धावांची भागिदारी झाली. सूर्याबाद झाल्यानंतर जाडेजा आणि विराट कोहलीने फिनिशिंग टच दिला. सूर्या बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने वादळी फलंदाजी करत फिनिशिंग टच दिला. जाडेजाने 15 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावांचे महत्वाचे योगदान दिले.