मोहम्मद शामीचा पुन्हा जलवा; अफ्रिकेचा निम्मा संघ 40 धावात गारद
India Vs South Africa World Cup 2023 : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. विराट कोहलीने आपले ऐतिहासिक 49 वे वनडे शतक ठोकले. त्याने नाबाद 101 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 77 धावांचे योगदान दिले. रोहित शर्माने सुरूवातीला आक्रमक फलंदाजी करत 40 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 29 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 22 तर शुभमन गिलने 23 धावांचे योगदान दिले.
भारताचे 327 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताने दोन धक्के दिले. दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने इन फॉर्म क्विंटन डिकॉकला 5 धावांवर बाद केलं तर रविंद्र जडेजाने कर्णधार टेंबा बाऊमाचा 11 धावांवर त्रिफळा उडवला.
लोकल बॉय मोहम्मद शामीने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. त्याने एडिन मारक्रमला 9 धावांवर बाद केले.
रविंद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्री क्लासेनला अवघ्या 1 धावेवर बाद करत त्यांना चौथा धक्का दिला होता. त्यानंतर मोहम्मद शामीने रासी वॅन डेर दुसेनला 11 धावांवर बाद करत आफ्रिकेची अवस्था 5 बाद 40 धावा अशी केली.