वर्ल्डकप पराभवानंतर हॉकी इंडियात मोठी खळबळ; प्रशिक्षकांनी थेट दिला राजीनामा!

नवी दिल्ली : (Indian Men’s Hockey Team coach Graham Reid resigned) मायदेशात झालेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 मध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघाचे क्रॉस ओव्हरमध्येच आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या असून आता थेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, रीड यांची भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी एप्रिल 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने टॉकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये कांस्य पदक पटकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या 58 वर्षीय ग्रॅहम रीड यांनी आपला राजीनामा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
रीड यांनी राजीनामा देताना सांगितले की, ‘आता पदावरून पायउतार होण्याची आणि नव्या व्यवस्थापकाकडे कार्यभार सोपवण्याची वेळ आली आहे. भारतीय संघासोबत आणि हॉकी इंडियासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी या ऐतिहासिक प्रवासाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’