जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी तरुणाने रचला होता क्वीन एलिझाबेथ यांच्या हत्येचा कट
लंडन | मागील वर्षी ब्रिटनची (Britain) राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं वयाच्या 96 वर्षी वृद्धपकाळानं निधन झालं. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. त्यांच्या निधनानंतर एक वर्षाने धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयाने एका 21 वर्षीय शीख तरुणाला 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
जसवंत सिंग चैल असे या शीख तरुणाचे नाव आहे. या तरुण 2021 मध्ये राणी एलिझाबेथ यांना धनुष्यबाणद्वारे मारणार होता. यासाठी तो एलिझाबेथ यांच्यापर्यंत आला होता मात्र त्यावेळी तेथील पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.
दरम्यान, न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लंडनमधील ओल्ड बेली नायालयाच्या सुनावणीत न्यायाधीश निकोलस हिलिअर्डने निर्णय दिला की, जसवंत सिंग चैल या तरुणाला बरे होईपर्यंत बर्कशायरमधील उच्च सुरक्षित मानसिक रुग्णालय ब्रॉडमूरमध्ये ठेवले पाहिजे. यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, जसवंत सिंह चैल याने ‘स्टार वॉर्स’ मालिकेपासून प्रेरित होऊन अशा पद्धतीने हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये सांगितले की, पंजाबच्या अमृतसरमध्ये 13 एप्रिल 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आपण हे केले. दरम्यान, शिक्षेच्या आदेशामागील त्याच्या तर्काचे स्पष्टीकरण देताना न्यायाधीश म्हणाले, या कृतीची कल्पना 2021 मध्ये झाली होती, जेव्हा जसवंत सिंग चैल हा तरुण मानसिकदृष्ट्या निरोगी होता.