आधी गुप्तांग कापले नंतर रस्त्यात फेकले; ससून रुग्णालयात अर्भकाची मृत्यूशी झुंज
पुणे | एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांसाठी (Pune Crime News) चर्चेत आहे. अशातच पुण्यात माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडली आहे. अर्भकाचे गुप्तांग कापून त्याला मृत्यूच्या छायेत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सर्व स्तरतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुप्तांग कापून रस्त्यावर टाकून दिलेल्या नवजात अर्भकाचा गेल्या सात दिवसांपासन मृत्यूशी लढा सुरू आहे. त्या अर्भकावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
22 नोव्हेंबर रोजी मुळशी तालुक्यात अकोले-शेरेगाव या दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळील एका शेतामध्ये नागरिकांना बेवारस अर्भक सापडले. तसेच त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचेही दिसून आले. पौड पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अर्भकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले.
दरम्यान अर्भकाचे वजनही खूपच कमी आहे, त्यामुळे अर्भक किती दिवसांचे असेल, याचे अंदाज डॉक्टरांना लावता येत नव्हता. गुप्तांग कापल्याने अर्भकाला मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे गुप्तांग कापण्यात आले. तसेच अन्य जखमा केल्या असाव्यात. या शक्यतेने पौड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्भकाला शेतात फेकून दिल्याने त्या ठिकाणी कुत्रे किंवा जंगली प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला आहे का, त्या हल्ल्यात प्राण्याने त्यांच्या गुप्तांगाला इजा पोहोचवली आहे का, या शंकेतून ससून रुग्णालय प्रशासनाने न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचा सल्ला मागितला आहे. त्यानंतरच नेमके प्रकरण काय आहे, ते समोर येईल, असे ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात येत आहे; तसेच नागरिकांना काही माहिती असल्यास, त्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.