अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टात नवी चाल, काका पवारांसह ठाकरेंना भारी पडणार?
Intervention Petition of Ajit Pawar Group : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे. याप्रकरणी अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कारवाई घाईत करण्याची गरज नाही, असा उल्लेख अजित पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेत नाहीत, त्यांना तातडीनं निर्णय घ्यायला सांगा, असं म्हणत केवळ एक पक्ष नव्हे तर महाराष्ट्रातल्या दोन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. या दोन्ही पक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालय एकत्रितपणे ऐकणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं आपली रणनीती आखली असून यासंदर्भात तीन हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहिती वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शिंदे यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. प्रतोद अनिल पाटील, नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ यांच्या नावे स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या हस्तक्षेप याचिकेतून न्यायालयाला सांगण्यात आलं आहे की, हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. अनिल पाटलांनी म्हटलंय की, मी प्रतोद आहे. नरहरी झिरवळ म्हणातयत की, मी उपाध्यक्ष आहे, असं सांगतानाच या प्रकरणात अजिबात घाई करण्याची गरज नाही, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, “अजित पवार गटानं ज्या तिघांच्या वतीनं तीन वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत, त्या तिघांची नावं महत्त्वाची आहेत. मंत्री छगन भुजबळ, प्रतोद अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ… तसेच तीन याचिकांमुळे तीन वेगवेगळ्या वकिलांना परवानगी मिळणार असून त्यामुळे तीन वेगवेगळे मुद्दे न्यायालयासमोर मांडता येणार आहेत.