चेन्नई : (IPL 2023 Chennai Super Kings vs Mumbai Indians) आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४९ वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचं नेतृत्व करणारा एम एस धोनी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत झालेल्या १५ आयपीएल हंगामात मुंबईने पाचवेळा तर चेन्नईने चारवेळा विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे मुंबई आणि चेन्नई यांच्यात नेहमीच हाय व्होट्लेज सामना होत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
या दोन्ही संघांमध्ये एकूण ३७ सामने झाले असून यामध्ये मुंबईने बाजी मारली आहे. मुंबईने २१ सामन्यांत विजय संपादन केलं असून चेन्नईला १६ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे चेन्नई आणि मुंबईत होणारी कांटे की टक्कर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महामुकाबला होत आहे, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तिलक वर्माला दुखापत झाल्याने त्याच्या जागेवर त्रिस्टॅन स्टब्सला खेळवण्यात येणार असल्याचं कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेकीदरम्यान जाहीर केलं.