IRE vs IND: पहिल्याच सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब, अन् रिंकू झाला भावुक!
IRE vs IND Rinku Singh’s Statement : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार कामगिरी करत आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला. भारताचा उगवता स्टार रिंकू सिंग या विजयाचा हिरो ठरला. त्याने फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावली आणि 38 धावा करत संघाला सन्मानजनक लक्ष्यापर्यंत नेऊन ठेवले. या खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला, अन् रिंकू सिंग भावूक झाला.
भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिंकूने 21 चेंडूंत 38 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याची सरासरी 180.95 इतकी होती. रिंकूच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याने आक्रमक होत, शेवटच्या 6 चेंडूत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला. रिंकूने पदार्पणाच्याच इनिंगमध्येच भारतीय क्रिकेटप्रेमींचे मने जिंकली.
आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या. गायकवाडने संघासाठी 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावाच करू शकला.