मदतीसाठी जिवाचे रान
इर्शाळवाडीत हाहाकार : माळीणच्या घटनेची आठवण
रायगड | कोकणात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे रायगडमधील (Raigad) खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या घटनेने माळीण येथील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते सकाळपासून इर्शाळवाडीच्या पायथ्याशी बचावकार्यावर नजर ठेवून होते. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली, तर केंद्र सरकार आवश्यक ती सगळी मदत करेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.