Cyber War: इस्त्राइल-पॅलेस्टाईनमध्ये आता सायबर हल्ले; या वॉरमध्ये भारताच्या हॅकर्सचाही समावेश
Israel-Palestine Cyber War | सध्या इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टाईनमधील (Palestine) तणाव चांगलाच वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही मोठं युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या युद्धात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. तर आता एकिकडे हे युद्ध सुरू असताना आता इस्त्राइल-पॅलेस्टाईनमध्ये सायबर वॉर (Cyber War) सुरू झालं आहे. विशेष म्हणजे या वॉरमध्ये भारताच्या हॅकर्सचा देखील समावेश आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये आता सायबर वॉर सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सध्या या दोन्ही देशांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत.
इस्त्राइलच्या ‘रेड अलर्ट’ या अॅप सिस्टिमवर सायबर हल्ले झाले होते. हे अॅप इस्त्राइलमधील एक रिअल टाईम अटॅक अलर्ट देणारं अॅप आहे. हे अॅप एखाद्या मिसाईल किंवा रॉकेट हल्ल्यावेळी सूचना देतं. तर अॅनॉन घोस्ट या नावाच्या एका हॅकर्सच्या ग्रुपने या अॅपवर सायबर अटॅक केला होता.
या सायबर वॉरमध्ये पॅलेस्टाईनला साथ देण्यासाठी जगभरातील हॅकर्स एकत्र आले आहेत. या सर्व हॅकर्सने मिळून इस्त्राइल सरकारच्या वेबसाईट्सवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्राइलला 35 प्रो-पॅलेस्टिनी सायबर ग्रुप्स टार्गेट करत आहेत. तर या सायबर वॉरमध्ये भारतीय हॅकिंग ग्रुप्स देखील आहेत. भारतीय हॅकर्सचे ग्रुप्स हे पॅलेस्टिनी वेबसाईट्सना टार्गेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.