इस्रायलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर ‘मोसाद’ गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित!
Israel-Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील (Israel vs Palestine) संघर्ष आता विकोपाला गेला असून हिंसाचाराच्या घटनेतून युद्धस्थिती उद्भवली आहे. शनिवारी पहाटे पॅलेस्टाइनवर अधिकार गाजवणाऱ्या हमास या दहशतवादी गटाने इस्रायलवर चौफेर हल्ला केला. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर मात्र इस्रायमधील ‘मोसाद’आणि ‘शिन बेट’या गुप्तचर यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होतोय. हमासने केलेल्या सर्वंकष हल्ल्यानंतर या दोन्ही गुप्तचर यंत्रणाचे अपयश ढळढळीतपणे पुढे आले असून, आता इस्रायलमधील सत्ताधारी अपेक्षेप्रमाणे या यंत्रणांवर प्रश्नांची सरबत्ती करू लागले आहेत.
भूमार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग अशा सर्व बाजूंनी इस्रायलवर हल्ला झाला. अत्यंत बलशाली सैन्य, कडेकोट सीमेवर जागोजागी असलेला कॅमेरे, कुंपण, अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा असा सगळा जामानिमा असतानाही हमासने तो भेदत हल्ला केला. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी कशा ठरल्या, ही चर्चा सुरू आहे. हमासने काही गडबड केली की तेवढ्यापुरती कारवाई व्हायची व पुढे सगळे आलबेल चालले आहे, मात्र हमास आपली ताकद दरम्यानच्या काळात वाढवत चालला होता, हे इस्रायली गुप्तचरांच्या लक्षातच आले नाही, असाही मुद्दा आता मांडला जात आहे. त्याचबरोबर, इस्रायलमधील राजकीय दुहीचा परिणाम देखील लष्कराच्या, गुप्तचर यंत्रणांच्या एकंदर क्षमतेवर झाला आहे, असेही आता टीकाकार म्हणू लागले आहेत.