चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिले पाऊल टाकले. भारताच्या या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली असून, आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून (IAF) जाहीर करण्यात आलेला जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इटलीतील मिलान येथे सोमवार १४ ऑक्टोबर रोजी ७५ वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद सुरू आहे. या परिषदेत भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेला हा पुरस्कार देण्यात आला. इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी हा पुरस्कार स्विकारला, या संदर्भातील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
या पुरस्काराविषयी माहिती देताना आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने (IAF-इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन) म्हटले आहे की, भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. इस्रोचे चांद्रयान-३ हे वैज्ञानिक प्रयोग आणि किफायतशीर अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रचंड क्षमतेचे ‘चांद्रयान-३’ मोहिम हे प्रतीक आहे. महासंघाने पुढे म्हटले आहे की, चांद्रयान-३ ने चंद्राची रचना आणि भूगर्भशास्त्रातील न पाहिलेले पैलू उघड केले आहेत. हे मिशन जागतिक पातळीवरील चांद्रयान मोहिमांसदर्भातील ऐतिहासिक यश इतर देशांनाही मार्गदर्शक ठरेल, असेही महासंघाने म्हटले आहे.