“त्यांचा सगळा वेळ ‘त्यातच’ जातोय”; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा निशाणा

नांदेड : मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊसानं हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबई, पुणे नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केले आहे. आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. अतिवृष्टीमूळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नांदेड मधील वसमत तालुक्यात ढगफुटी झाल्यानं पाणी नदीपात्राच्या बाहेरून गावांमध्ये शिरले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान येथील गावांच्या दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी सरकारला तत्काळ मदत करण्याची विनंती केली आहे.
‘सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले आहेत. त्याधीही १५ दिवस गुवाहाटीत घालवले आहेत. मात्र, राज्यात काय सुरु आहे याकडे सरकारचे लक्ष नाही. संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. गावांमध्ये पाणी शिरत आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अजून सरकार स्थापन करता आले नाही’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा खातेवाटपात आणि कुणाला किती खाती द्यायचे आणि कोणाला काय मंत्रिपद द्यायचं यातच वेळ जात आहे.’ असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.