“भाजप नेत्यांकडून महापुरूषांचा अपमान करण्याची स्पर्धाच…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र

मुंबई | Jitendra Awhad On Chandrakant Patil – मागील काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच आता भाजपचे नेते, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आंबेडकर, फुले, कर्मवीर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून आता नवीन वादाल तोंड फुटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून महापुरूषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरूषांची बदनामी करणारे वक्तव्य येत आहेत. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेधही केला आहे.
दरम्यान, काल (9 डिसेंबर) चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार त्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या आहेत. सरकारनं या शाळा सुरू करताना त्यांना अनुदान दिलेलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरवून दाखवलं.
2 Comments