आव्हाडांचा ‘तो’ धक्कादायक दावा खरा? संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, शिंदे-पवार गटाला धक्का
नागपूर : (Jitendra Awhad On Shinde Group) आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा दावा पाहता संघ आणि भाजपच्या गोटात प्रत्यक्षात वेगळयाच हालचाली सुरु असल्याने हा दावा नाकारता येणार नाही.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले.
या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभुमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आपल्याला स्वबळावर मोठे यश मिळू शकते, याची खात्री भाजपला वाटू लागली आहे. त्यामुळेच शिंदे गट आणि अजितदादांच्या गटाचे जोखड मानेवरुन दूर सारुन स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजप आणि संघाच्या गोटात सुरु असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.