ताज्या बातम्यापुणेशिक्षण

इंदापूरमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन; हजारो युवक-युवतींच्या हातांना मिळणार काम

इंदापूरJob opportunity | मागील दोन वर्षांच्या कालावधीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व त्यानंतर निर्माण झालेली आर्थिक मंदी यामुळे हजारो तरुणांच्या हातांचा रोजगार गेला. अनेक तरुण बेरोजगार झाले. अनेकांच्या कुटुंबांचा तर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ग्लोबल एमबीए हे उच्च शिक्षण घेतलेला इंदापूरचा युवक अंगद शहा या तरुणांसाठी पुढे सरसावला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील हजारो युवक-युवतींच्या हातांना रोजगार मिळणार आहे.

इंदापूर येथे नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने, इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे मुख्य सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहर व तालुक्यातील युवक-युवतींसाठी, शनिवारी (दि.१८ जून) शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य नोकरी महोत्सव २०२२चे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील अनेक युवक-युवती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत असताना मी पाहिले आहेत. अशी हजारो होतकरू मुले इंदापूर तालुक्यात असून, ग्रामीण भाग असल्यामुळे अनेकांना नोकरी मिळणे कठीण होत आहे. पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीला जाण्यासाठी युवक-युवतींना माध्यम व आधार नसल्याने त्यांना जाणे शक्य होत नाही. मात्र त्यांना आम्ही संधी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तालुक्यातील युवक-युवतींनी या भव्य नोकरी महोत्सवाचा अवश्य फायदा घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा.
_अंगद शहा, युवक प्रतिनिधी, नेहरू युवा केंद्र, पुणे

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरात पहिल्यांदाच नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता आठवीपासून ते पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी हा नोकरी महोत्सव असणार आहे.

मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकॉम, आयटी, बीपीओ, केपीओ, फार्मा, अशा विविध क्षेत्रांमध्ये, इंदापूर शहरातील व तालुक्यातील युवक-युवतींना नोकरी या उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

  • लागणारी आवश्यक कागदपत्रे : नोकरी महोत्सवामध्ये येताना उमेदवाराने पुढील कागदपत्रे आणणे आवश्यक आहेत. यामध्ये बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी माहिती ५ प्रतींमध्ये सोबत आणावी.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये