जुन्नरच्या हापूसला मिळाली वेगळी ओळख; ‘या’ नावाने ओळखला जाणार
जुन्नरमधील हापूस आंब्याला अखेर “शिवनेरी हापूस मँगो” या नावाने नवी ओळख मिळाली असून, त्याला जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या ऐतिहासिक यशासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अथक प्रयत्न केले. या मानांकनासाठी ११५ वर्षांपूर्वीच्या हापूस आंब्याच्या झाडांची नोंद घेण्यात आली.
शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून या आंब्याच्या वैशिष्ट्यांची सिद्धता करण्यात आली. कोकणात देखील हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. त्यामुळे जुन्नरमधील हापूसला वेगळी ओळख मिळवून देण्याचा संघर्ष सुरू होता. “हापूस” या नावावरून वाद असल्याने जुन्नरमधील हापूस आंबा विशेषत्वाने ओळखला जात नव्हता.
साडेतीनशे वर्षांचा उल्लेखनीय इतिहास असलेल्या जुन्नरच्या वैशिष्ट्यपूर्ण शिवनेरी हापूसला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन म्हणजेच ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’चा (जीआय टॅग) मान दिला आहे. रत्नागिरी हापूसप्रमाणेच आता आंतराराष्ट्रीय स्तरावर जुन्नरचा हापूस शिवनेरी हापूस या नव्या नावाने ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे, देशातील कृषी क्षेत्रात सर्वाधिक ‘जीआय टॅग’ असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी आंबा हा सर्वगुण संपन्न असायला हवा. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तताही या फळबागायतदार शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जुन्नर भागातील हापूस आंबा चवीला गोड, रसाळ आणि रुचकर आहे. याचा वास, रंग या सर्वच बाबतीत तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आंब्याला ऐतिहासिक असे महत्वही आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही आंब्याचे उल्लेख आहेत.