आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिला डॉक्टरचा हैदराबादमध्ये मृत्यू; वडिलांची न्यायालयीन चौकशीची मागणी

तेलंगणा | वारंगल येथील काकतिया मेडिकल कॉलेज (KMC) ची प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी डॉ. धारावथ प्रीथी हिने तिच्यावर झालेल्या छळानंतर 22 फेब्रुवारी रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रविवारी रात्री हैदराबादमधील निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) ने मृत घोषित केले. प्रीथीने द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी मोहम्मद सैफ याच्या छळामुळे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे उघड झाले. सैफला मत्तेवाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2022 पासून सैफ प्रीथीचा छळ करत असल्याचे उघड झाले. वारंगलचे पोलीस आयुक्त ए व्ही रंगनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला वारंगलमधील तृतीय न्यायिक प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर खम्मम तुरुंगात हलवण्यात आले. प्रीथीचे वडील नरेंद्र यांनी सांगितले होते की, त्यांच्या मुलीला तिच्या वरिष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले, तिच्या आत्महत्येच्या कारणाचा योग्य तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी प्रीथीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले, “आम्हाला प्रीती निरोगी परत येण्याची आशा होती पण ती परत न येण्याच्या जगात गेली. राज्य सरकार तिच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे.”