मुंबईतील पुरुषाचे युक्रेनी महिलेशी विवाहबाह्य संबंध; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
मुंबई | शहरातील कल्याण भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. नामांकित शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र पत्नाच्या विरोधानंतरही पती न सांगता गुपचूप युक्रेनला गेला. हे कळल्यानंतर 25 वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक माहिती मिळत आहे. या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच युक्रेनमधून परतलेल्या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश नायर असे अटक झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तो कल्याण येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे. मृत महिलेच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नितीशवर माझ्या मुलीचे प्रेम होते. त्यामुळे दोघांचा प्रेमविवाह 2020 मध्ये झाला होता. दोन वर्ष सुखाने संसार सुरू असतानाच, सप्टेंबर महिन्यात तरुणीला काही माहिती मिळाली. त्यावरुन आपला पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिला आला होता.
याशिवाय तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही तिला मोबाईलमध्ये दिसल्याने संशय अधिकच बळावला होता. त्यातच कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, तरुणीला पतीच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने त्यांच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशारा पतीला दिला होता.
नितीशने आपल्या पत्नीला सांगितले की तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नीला मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही, तसेच तू मला विसरून जा, दुसरा मार्ग निवडावा, असा मेसेज आरोपी पतीने पाठवल्यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती, त्यानंतर तिला खूप मानसिक आघात झाला आणि 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणाच्या तोंडावरच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुसरीकडे आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर मृत पत्नीचे कुटुंबीय त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.