“तुम्हाला लाज वाटली पाहिजे…”, फ्लाइटला उशीर झाल्यामुळे कपिल शर्मा संतापला
Kapil Sharma | सध्या कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण कपिल शर्मानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं इंडिगो (Indigo) फ्लाईटच्या सेवेबाबत संताप व्यक्त केला आहे. निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना विमान उड्डाणाची वाट पाहावी लागल्यामुळे कपिल शर्मानं संताप व्यक्त केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
कपिल शर्मानं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं ‘इंडिगो’ या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. कपिलनं ट्विट करत म्हटलं आहे की, सर्वात आधी तुम्ही आम्हाला 50 मिनिटं बसमध्ये थांबायला लावलं. त्यानंतर आता तुमची टीम म्हणते, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. खरंच, 8 वाजता या विमानानं उड्डाण करायला हवं होतं, पण आता 9.20 झाले आहेत.
पुढे कपिलनं इंडिगो एअरलाईन्सवर टीका केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, विमानाच्या कॉकपिटमध्ये अजूनपर्यंत एकही पायलट आलेला नाही. या अशा प्रसंगामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या 180 प्रवाशांना पुन्हा या विमानानं प्रवास करावासा वाटेल का?
आता सर्व प्रवाशांना ते विमानातून उतरवत आहेत आणि सांगत आहेत की, आम्ही तुम्हा सर्वांना दुसऱ्या विमानात पाठवू. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा सुरक्षा तपासणीसाठी टर्मिनलवर जावं लागणार आहे. पण इंडिगोचे कर्मचारी खोटं बोलत आहेत. व्हील चेअरवर काही वृद्ध प्रवासी आहेत. त्यांची प्रकृती ठिक नाहीये. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत कपिलनं राग व्यक्त केला आहे.