एमसी स्टॅनला करणी सेनेचा थेट इशारा; शोमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरणे बंद केले नाही तर…
इंदूर | बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या (Bigg Boss 16) पर्वाचा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनची (MC Stan) क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. विजेतेपद मिळवल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅन हा सध्या भारत दाैऱ्यावर आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये त्याचे शो होत आहेत.
बिग बाॅस 16 जिंकल्यानंतर लगेचच एमसी स्टॅन याने आपला भारत दाैऱ्याची चाहत्यांना माहिती दिली होती. 17 मार्चच्या रात्री इंदूरच्या लासुदिया भागामध्ये हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होता. दरम्यान, करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक स्टेजवर येत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. एमसी स्टॅन याने शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. या सर्व गोंधळानंतर एमसी स्टॅनचा शो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट करणी सेनेने एमसी स्टॅन याला मोठा इशारा दिला आहे.
करणी सेनेचा आरोप आहे की, रॅपर एमसी स्टॅन हा शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरतो. इतकेच नाहीतर तो मुलींबद्दल देखील काही आक्षेपार्ह बोलतो. करणी सेना युथ अध्यक्ष भागवत सिंह बालोट यांनी आता इंदूरमधील शो रद्द होण्याचे कारण सांगितले आहे. भागवत सिंह बालोट म्हणाले की, एमसी स्टॅन याचा शो पाहणाऱ्या तरूणांवर काय परिणाम होईल. तो शोदरम्यान अपशब्द वापरतो. आमचे म्हणणे आहे की, त्याने शोदरम्यान चुकीचे शब्द वापरू नये. जर शोमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरणे बंद केले नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा आता एमसी स्टॅन याला करणी सेनेकडून देण्यात आला आहे.