“…त्याची किंमत चुकवावी लागेल”, एमसी स्टॅनला करणी सेनेच्या युवा अध्यक्षांचा गंभीर इशारा
मुंबई | Mc Stan – ‘बिग बाॅस 16’चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅन (Mc Stan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. एमसी स्टॅनचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच सध्या स्टॅन मोठ्या शहरांमध्ये आपले शो करताना दिसत आहे. नुकताच त्याचा इंदूर येथे शो पार पडला. मात्र, या शोमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टॅनच्या शोमध्ये गोंधळ घालत हा शो बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे.
एमसी स्टॅनच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान करणी सेनेच्या निषेधामुळे शो मध्येच थांबवावा लागला. कारण स्टॅनच्या रॅपमध्ये असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे करणी सेनेनं नाराजी व्यक्त केली होती. तसंच आता करणी सेनेचे युवा अध्यक्ष भागवत सिंह बलोत यांनी स्टॅनला इशारा दिला आहे.
भागवत सिंग बालोत यांनी फिल्मी बीटशी बोलताना सांगितलं की, एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये अपशब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स पाहणाऱ्या तरुणाईवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याच्या गाण्यात अपशब्द आणि महिलांचा अपमान करणारे शब्द असतात त्यामुळे स्टॅनचा राग येत असल्याचंही सिंग म्हणाले.
करणी सेनेनं कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. मात्र, जर कोणी आक्षेपार्ह मजकूर आणि गाणी वापरल्यास त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भागवत सिंग यांनी दिला आहे. तसंच लोक प्रसिद्ध होण्यासाठी गाण्यात शिव्या देत असतात. गाण्याची प्रतिभा तुमच्यात आहे, तुम्ही नक्कीच गा, पण तुमच्या गाण्यात अपशब्द वापरू नका, असं आवाहनही सिंग यांनी केलं आहे.